Wednesday, March 17, 2010

जेवण

या. आज उशीरा आलात मास्तर. तिकडे नको इकडे बसा की पलंगावर. पंख्याचा वाराही येतो तिथं.

लवकर काय अन उशीरा काय? घरी एकट्या असणार्‍याला वेळेचे काय?

आसं कसं वेळेवर जेवण झालं ठिक असते प्रकृतीला. सगळ्या गोष्टी वेळेवर व्हायला पाहिजे.

तुमचे बरोबर आहे हो. पण वेळेआधी जेवले म्हणजे सगळाच प्रॉब्लेम. अन बाकीचे मेंबरं पण काय म्हणतील?

बाकीचे मेंबरं काय हो, गप जेवतात अन जातात. तुमचे कसे सगळे वेगळेच आहे. म्हणून तर मी तुम्हाला निरनिराळे पदार्थ देते, खावू घालते. इतरांना देत नाही असले काही.

अहो, तुमच्याकडे आम्ही काय जेवायला येतो का नुसते? पोट पुर्ण भरले तरच जेवणाची मजा आहे. आम्ही जेवणावर प्रेम करणारे आहोत.

मास्तर, तुमच्यासारख्यांच्या प्रेमानेच तर सगळे मिळते आम्हाला. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. नाहीतर आमच्यासारख्या खानावळी उघडणारे भरपूर आहेत. पण तुम्हाला काय हवं काय नको ते आज मी बघणार आहे.

वा वा आज चांगलाच योग आहे.

हो तर. आज पुर्ण जेवण करणार की नाश्ता भरवू फक्त?

तुम्ही काय देणार?

तुम्ही म्हणाल ते.

आज आम्ही पुर्णच जेवण करणार बघा.

तुम्ही काय जेवणार पुर्ण? तुम्ही तर सत्रा ठिकाणी जेवण करणारे. आधीच नाश्ता जेवण करून आलेले दिसतात. गेला असाल हाटेलात .

असं म्हणू नका. पुर्ण जेवणाच्या आशेनेच आम्ही येथे आलो नं? मग?

बरं, ठिक आहे. काय काय वाढू तुम्हाला?

तुम्ही म्हणाल तसं. काहीपण वाढा. पण सगळं साग्रसंगीत झालं पाहीजे. अगदी पाण्यापासून ते शेवटी तोंड गोडही झालं पाहीजे.

आता हे तुम्ही आम्हाला सांगता? तुम्हाला काय हवं काय नको हे सगळं आम्हाला तोंडपाठ आहे. नेहमीचं मेंबर तुम्ही आमचे. बरं कोठे बसता जेवायला? आत वाढू की येथेच बाहेर करणार जेवण?

बाहेर नको, आतच बसतो. बाहेर इतर मेंबरचाही त्रास होतो. म्हणजे पैसे ही द्यायचे अन जेवणाचे समाधानही नाही. शांतपणे जेवण करण्यातच मजा आहे. म्हणुनच तर आम्ही येथे येतो. हो की नाही?

ते तर खरेच हो. तुम्हाला आत जातीने वाढते. बघते कोण उपाशी राहते ते.

अहो आजच्या जेवणाने काय होईल? एकतर आम्ही एकटे माणूस. लग्नानंतर आम्ही घरीच जेवू. तरीही तुमची आठवण येतच राहील हो.

बरं बरं मास्तर. जास्त हरभर्‍याच्या झाडावर चढवू नका. बोलतांना तुमचे तोंड कोणी घरू शकत नाही. चला तर मग लवकर बसा.

हो हो आलो लगेचच. तुम्ही तयारी करा तर मग.

1 comment:

Anonymous said...

kaay he jaraa samajavata kaa?