Tuesday, September 14, 2010

गाणे : असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती

मी मराठी वरच्या "गाण्याच्या-यशामधले-संगीत-संयोजकाचे-योगदान" या धाग्यावरून मला खालील गाणे करता आले. या गाण्यातले दुसरे कडवे त्या धाग्याला लागू होते. (मी माझीच स्तूती करत नाही पण हे गाणे अर्ध्या तासात स्पुरले गेले. सगळे श्रेय त्या मुळ धागालेखकाला आहे.)

असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती


असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती
पावसाचे थेंब काही गटारात जाती, काही थेंब मोती होती
जगात कोणी प्रसिद्ध होती, कोणास कोणी ना ओळखती ||धृ||

जगाची रित ही न्यारी चांगलीच असती सकळा प्यारी
बाह्यरूप जरी केवळ देखणे, अंतर्मनास कोणी ना विचारी
पथ्थरास एका भजती पुजती, एका पथ्थरास पायात चिरती
असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती ||१||

कोण कवने करी गाण्यात, कोण ते लावी चालीत
कोण सुस्वर देई संगीत, कोण तयाला गाई लयीत
असते का कोणा ठावूक? मागे कोण कोरस गाती?
असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती ||२||

कृष्णसख्याचे प्रेम पाहूनी, राधा मीरा रूक्मिणी आठवती
सार्‍यांनाच प्रेम मिळाले, तरी गोपीकांचे नावे न ओठी येती
श्रीमंतांनाच सारे विचारती, गरीबास न कोणी पुसती
असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती ||३||

कितीक धागे संस्थळी निघती, कितीक धागे वाचले जाती
कितीक लेखक अन कवी सार्‍या अंतरजालावरी येती
काहिंच्याच धाग्यावरती प्रतिसादावर प्रतिसाद पडती
(जे कंपूत न राहती त्यांचे धागे गंडती
फारच थोडे धागे दुर्लक्षीतांचे प्रतिसादाने राहती वरती)
असेच असते जीवन कुणाचे नच तयाला कोणी गणती ||४||

असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती
पावसाचे थेंब काही गटारात जाती, काही थेंब मोती होती
जगात कोणी प्रसिद्ध होती, कोणास कोणी ना ओळखती ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०७/२०१०

No comments: