Thursday, April 7, 2011

एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा


एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा

एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||धृ||

किती वारी चालू आता किती दिंडी चालू
संसारातून सोडवी आता नको वेळ घालू
आतूरले डोळे माझे वाहे चंद्रभागा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||१||

किती ग्रंथ वाचले अन म्हटल्या मी ओव्या
संतांच्या साथीने कितीक आरत्या म्हणाव्या
शिणलो रे मी आता होई पापभंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||२||

जळावीण मासा जिव धरी कैसा
मायेविणा पोर प्रेम पाही जैसा
नको धरू राग आता नेई तुझ्या संगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||३||

आयुष्य नासले अनंते हाती केले पाप
पुण्य नाही केले कर आता माफ
शेवटाला आलो रंगलो तुझ्या रंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०८/२०१०

No comments: